मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच आपल्या देशात काही नवीन नियम लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. विशेषतः, १ मे २०२५ पासून एटीएमच्या नियमांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.
आता एटीएममधून पैसे काढणे आणि शिल्लक तपासणे देखील अधिक महाग होणार आहे. नुकतेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे, पुढील महिन्यापासून दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून केलेले व्यवहार तुमच्या खिशाला अधिक भार टाकणार आहेत.
एटीएम शुल्कातील वाढ:
सध्याच्या नियमांनुसार, तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएमऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून मोफत मर्यादेनंतर पैसे काढल्यास, प्रति व्यवहारासाठी १७ रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, १ मे २०२५ पासून हे शुल्क थेट १९ रुपये होणार आहे. आरबीआयने बँकांना मोफत मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त २३ रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फक्त पैसे काढणेच नव्हे, तर एटीएममध्ये शिल्लक तपासणे देखील आता महाग होणार आहे. नवीन नियमांनुसार, १ मे पासून प्रत्येक वेळी तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये बॅलन्स तपासल्यास, तुम्हाला ७ रुपये शुल्क भरावे लागतील. सध्या यासाठी ६ रुपये शुल्क आकारले जाते.