Passengers and bus driver fight : पुणे शहर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असते आणि येथे कधी काय घडेल याचा अंदाज लावणे कठीण असते. अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रासपणे दिसून येते, तर कधी पुण्यातील रिक्षाचालक प्रवाशांना आणि ॲप-आधारित रिक्षाचालकांना त्रास देताना आढळतात.
पीएमपीएमएल बसमध्ये तर प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्या पैशांवरून वाद होणे नित्याचे झाले आहे. काही दिवसांपूर्वीच, एका पीएमपीएमएल बसमध्ये एका महिलेने चप्पल घालून सीटवर पाय ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, आणि वाहकाने वारंवार विनंती करूनही तिने लक्ष दिले नाही. अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. आता यात पीएमपीएमएल बसमधील एका नवीन घटनेची भर पडली आहे, ज्यात पुन्हा एकदा बस चालक आणि एका प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झाले आहे.
बस चालक आणि प्रवाशांमध्ये संघर्ष
एका प्रवाशाला मागच्या बाजूच्या दरवाजाने बसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे त्याने संतप्त होऊन पीएमपीएमएल बसच्या दारावर वीट फेकली आणि चालकाला मारहाण केली. लोणी स्टेशन चौकात बस चालक आणि प्रवासी यांच्यातील हाणामारीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, आणि आता पुन्हा त्याच प्रकारची दुसरी घटना समोर आली आहे.
बुधवारी सकाळी, वाघोलीहून भेकराई नगरकडे जाणारी १६७ए क्रमांकाच्या पीएमपीएमएल बसमध्ये एका प्रवाशाला मागील दरवाजाने चढू न दिल्याने वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. बस कंपनीच्या नियमांनुसार मागच्या दरवाजाने प्रवाशांना चढण्याची परवानगी नसते. सकाळी सुमारे ९:१५ वाजता ही घटना घडली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बस चालकाशी मारामारी करताना दिसत आहे, तर बसमधील वाहक या घटनेचे चित्रीकरण करत आहे. एका अन्य प्रवाशाने मध्यस्थी करून दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
भेकराई नगर डेपोचे व्यवस्थापक सुरेंद्र दांगट यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की, “सकाळी ९ च्या सुमारास, अमानोरा मॉलजवळ एका प्रवाशाने मागच्या दाराने उतरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही घटना घडली. बसमध्ये बरीच गर्दी होती आणि दुर्दैवाने तो त्याच्या अपेक्षित थांब्यावर उतरू शकला नाही. चालकाने त्याला पुढील थांब्यावर उतरण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली आणि नंतर त्याचे रूपांतर मारामारीत झाले. या संदर्भात विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.”
यावरून स्पष्ट होते की, पुणे शहरात विविध प्रकारच्या समस्या आणि घटना नेहमी घडत असतात, ज्यामुळे हे शहर सतत चर्चेत राहते.